Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर
खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर
ऐतिहासिक कल्याण परिसरावर पूर्वी शालिवाहन राजांची सत्ता होती. शालिवाहन राजे शिवप्रेमी असल्याने कल्याण-ठाणे परिसरांत अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत. कल्याण-शिळफाटा मार्गावरील खिडकाळी येथील शिवमंदिर हे त्यापैकीच एक. काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर खूपच आकर्षक वाटते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराप्रमाणेच हे मंदिरही स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचा आदर्श नमुनाच आहे.
कल्याण-शिळफाटा मार्गावरील शिळफाटय़ाच्या अलीकडे खिडकाळेश्वर मंदिर आहे. हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार हे मंदिर पाहताना दिसतो. या मंदिराच्या भिंतीवर सुबक कलाकुसर करण्यात आली आहे. मंदिराचे खांब, प्रवेशद्वार, खिडकी, कोनाडे यांची रचना अप्रतिम असून एक उत्तम शिल्प पाहात असल्याचे हे मंदिर पाहताना वाटते. मंदिरातील शिवगाभारा खोलवर असून, काही पायऱ्या उतरून शिवलिंगापर्यंत जाता येते. मंदिराच्या बाहेर एक दगडी शिल्प असून, भाविक या शिल्पाचेही दर्शन घेतात. त्यामुळे ती पूजनीय शिळा असावी. मंदिर परिसरात इतरही अनेक देवांची मंदिरे आहेत. अनेक बाबा-महाराजांची समाधीस्थळेही आहेत. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, त्यात सिमेंट, काँक्रीट व आधुनिक टाइल्सचा अधिक वापर केल्याने मूळ शिल्पाकृतीचे सौंदर्य काही प्रमाणात नाहीसे झाले आहे.
या मंदिराच्या बाजूला एक छोटेसे तळे आणि उद्यान आहे. शिवदर्शन घेतल्यानंतर या तळ्याकाठी व उद्यानात फेरफटका मारल्यास आल्हाददायक वाटते. या तळ्याच्या चोहोबाजूने पायऱ्या असल्याने तळ्याच्या पाण्यापर्यंत जाता येते. तळ्याभोवती फिरण्यासाठी पदपथ व एक पूल बांधण्यात आला आहे. या तळ्यात अनेक विविधरंगी, विविध आवाज काढणारे पक्षी येत असल्याने पक्षीप्रेमींसाठी हे तळे एक पर्वणीच आहे. येथील उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे. संध्याकाळच्या वेळी या मंदिर परिसरात फिरायला व बागडायला खूपच आल्हाददायक वाटते.
अप्रतिम👌👌👌
ReplyDelete