SARASGAD - सरसगड



SARASGAD - सरसगड 

सरसगड माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे. पाली गावातून डोंगरधारेवरून गडाच्या माचीवर जातांना दोन कातळ कड्यांमध्ये (नाळेत) कातळात खोदलेल्या १०० पायर्‍या चढाव्या लागतात. पायर्‍यांच्या वाटेवर कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार पाहायला मिळते. प्रवेशव्दारावर कलश कोरलेला आहे. प्रवेशव्दारच्या आतील बाजूस खांब असलेली खोली (देवडी) आहे. पायर्‍या संपल्यावर आपला दिंडी दरवाजातून माचीवर प्रवेश होतो.
दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायर्‍या वर चढाव्यात, म्हणजे तटबंदी दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद (‘मोती हौद’) आहे. पुढे तसेच उत्तरेकडे चालत गेल्यावर पाण्याच एक टाक व वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. उत्तर टोकाला एक दगडांनी बांधलेला दरवाजा आहे. त्याला उत्तर दरवाजा म्हणतात. दरवाजा जवळ एक भुयारी मार्ग आहे. सध्या हा मार्ग मात्र बुजलेला आहे. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. दरवाजातून खाली उतरून गेल्यावर उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा आहेत. परत दरवाजाजवळ येऊन डावीकडे गेलो की १५ पायर्‍या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.

बालेकिल्ल्याचा पायथा :

समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक शहापीराचे थडगे आहे. त्याच्या जवळच पुन्हा पाण्याची तळी आहेत.जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे , शस्त्रागारे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. येथे दहाबारा जणांची रहाण्याची सोय होते. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो.

बालेकिल्ला माथा :

बालेकिल्ल्याच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, घनगड आणि कोरीगड दिसतो तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण,जांभुळपाडा असा सर्व परिसर दिसतो. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते.
सरसगड पाहायला दोन ते तीन तासात लागतात. 
पोहोचण्याच्या वाटा :
१) गडावर जाण्यासाठी मात्र ‘दिंडी’ दरवाजाची वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस असणार्‍या डांबरी रस्त्यावरून डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेकर्‍यांना राहण्यासाठी होत असे. पुढे दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी ९६ पायर्‍या चढाव्या लागतात. या पायर्‍या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो. पायर्‍यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पायर्‍या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात.

२) गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती फारशी वापरात नाही. पालीहून तेलारी गावात जावे. तेलारी गावातून घळीमार्गे उत्तर दरवाजा गाठावा.

राहाण्याची सोय :
गडावर तसे पाहिले तर राहण्याची व्यवस्थित सोय नाही मात्र ७ ते ८ जणांना दिंडी दरवाज्यासमोर असणार्‍या देवडयां मध्ये अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते पण गडावर फार कमी ट्रेकर्स रहातात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करवी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत, पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

Comments

Popular posts from this blog

RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर

JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!